आठवणी दाटतात भाग ३
आठवणी दाटतात
१ - माझा अनुग्रह एक विलक्षण घटना
भाग ३
त्यावेळी तपोवनात खरोखर दस नाम संन्यासी होते . उदा. गिरी,पुरी, भारती, अरण्य सागर भारती , तीर्थ , दसनाम संन्यासी म्हणजे हिंदू धर्माचे रक्षक आहेत म्हणून त्यांना त्रिशूल तलवार धारण करण्याची परवानगी आहे . त्यांच्या कुटीया असायच्या . वेगवेगळे जुने कुंड असायचे विशेष म्हणजे शूर्पणखा कुंड सुद्धा होते. तो परिसर खर्या अर्थाने तपोभूमी वाटायचा. आता मात्र तेथे बिल्डिंगा उभ्या राहिल्या आहेत. कुंभमेळ्याच्या वेळी फार आनंद वाटायचा लाखोंच्या संखेत साधू संत येत असत. संपूर्ण नासिक कसे धार्मिक वातावरणात न्हावून निघत असे. आम्ही शाळा बुडवून कुंभ मेळ्यात फिरायला जायचो आणि त्याच आनंदात दिवस कुठे जायचा हे कळत नसे. अनेक साधुसंताचे दर्शन व्हायचे . सर्व आखाड्याचे साधू भेटायचे पण आम्हाला त्यावेळी एव्हडे कळत नव्हते. कसेही असो पण संतदर्शन आणि गंगास्नान रोज घडत असे. बाई म्हण्याची ", अशोक जरा सांभाळून जा बरका गर्दीत चुकशील ". मी म्हणायचो , " बाई तू काळजी नको करू मी नाही चुकणार ." लवकर घरी ये बर कां ." नाही तर तुला तुझे वडील रागावतील ." बाई मी लवकर येईल पण तू मात्र आप्पांना सांगू नको " अप्पांचा आम्हाला फार धाक होता. आता एका गोष्टीचे वाईट वाटते ते म्हणजे " कुठे "चुकाशील " असे म्हणणरे कोणी नाही .
दिनक २७-५-१९६४ ला भारताचे पहिले पंतप्रधान
पंडित जव्हारलाल नेहरू यांचा मृत्यू झाला तसेच त्यांच्यानंतरचे पंतप्रधान लाल
बहादूर शास्त्री यांचा ताश्कंदमध्ये ११-१-१९६६ ला संशयास्पद मृत्यू झाला या
दोघांचेही त्या त्या वेळी अस्थीकलश नासिकला गोदावरीमध्ये अस्थी विसर्जित
करण्यासाठी आणण्यात आले होते मेन रोड गर्दीने तुडुंब भरून गेला होता त्यानंतर
रामकुंडावर अस्थींचे विसर्जन झाले याचे साक्षीदार आम्ही आहोत. .
आप्पा आणि बाई दोघे मिळून खूप कष्ट करीत असत . त्रिंबक व ब्रह्मगिरी परिसरातील आदिवासी व शेतकरी बैलगाड्यामध्ये डोंगरातील गवत भरून नाशिकमध्ये विकायला येत असत व रात्री त्रिंबक रोडला रस्त्याच्या कडेला थांबत असत तेथून आप्पा आणि बाई पाहटे सायकलवर शेण घेऊन यायचे नंतर बाई त्याच्या गोव-या थापून विकीत असे .
एक प्रसंग सांगण्यासारखा आहे . आम्ही सुरवातीला म्हणजे साधारपणे १९६२ साली नाशिकमध्ये सरकारी खोली न मिळाल्यामुळे श्री संत गाडगे बाबा यांच्या धर्मशाळेत खोली घेऊन राहत होतो . तेथे दररोज आंधळे पांगळे यांना अन्नदान होत असे . बाई तेथे विनामूल्य स्वयंपाकाला जात होती तिच्या ठिकाणी सेवा भाव मुळातच होता. त्यानंतर सरकारी खोली मिळाली त्रिंबक रोडला कालव्यासमोरच आमची खोली असल्यामुळे त्यातच रोज पोहायचे व आनंद घ्यायचा .
एके दिवसी आमच्या गावाचे म्हणजे बुऱ्हानगरचे एक प्रतिष्ठित व पदाधिकारी सहकुटुंब तीर्थयात्रेकरीता नासिकला आले होते ते गाडगेबाबा धर्मशाळेत थांबले होते. आप्पा सकाळीच गंगेवर भाजी आणण्याकरिता गेले होते , तेवढ्यात बाजारात गलका झाला , काय झाले म्हणून आप्पा बघायला गेले तेवढ्यात या महाशयांनी आप्पाना बघितले व धावतच येवून आप्पांना मिठी मारली . आणि काकुळतीला येवून म्हणाले “ अरे ! सदाशिव धाव लवकर माझे पैशाचे पाकीट चोरांनी मारले आहे . “ आप्पांनी जेथे भाजी घेत होते तेथील भाजीवाल्या बाईच्या टोपलीतच ते पाकीट चोरट्याच्या हातून पडले होते. आप्पांनी ते पाकीट घेतले आणि त्यांना दिले .ते पाकीटमार लोक आप्पाना म्हणाले झाले गेले विसरून जा आम्हाला काही तरी पैसे द्या मग आप्पांनी त्यांना १०० रुपये देवून वाटे लावले. हा सर्व प्रकार झाल्यानंतर या आमच्या पाहुण्यांना एक दिवस घरी बोलावून मस्त पाहुणचार केला . माणूस एखाद्याने केलेले केलेले उपकार फार लवकर विसरत असतो ! . पुढे जेव्हा आप्पांना गावात घर बांधायचे होते (१९६७ -६८)तेव्हा याच व्यक्तीने त्यांच्याकडून ग्रामपंचायत कार्यालायातून उतारा ७ /१२ घ्यायचा होता तेव्हा आप्पांकडून दोन रुपये घेतले होते. असो मानवी प्रवृत्ती अशीच असते. .
.क्रमश: ४

ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाअप्रतिम
हटवाछान बाबा
हटवाधन्यवाद मित्रांनो
हटवा