आठवणी दाटतात भाग ४

                                              आठवणी  दाटतात 

                        १ -  मातोश्रीची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा 

                                              भाग  ४ 


 

       


  ब्रह्मगिरीची  प्रदक्षिणा भाविक करतात तसेच सौ दाते बाई व आमची आई यांनी दीर्घ प्रदक्षिणा एका दिवसात केली होती आजही लोक हि प्रदक्षिणा करतात. आप्पांना जर म्हटले कि “ चला आपण गंगेवर स्नानाला जावू “ ते लगेच म्हणायचे “ अरे आपल्या नळाला त्याच गंगेचे पाणी येते. मी येथेच नळाखालीच अंघोळ करणार”.  ते कधी कधी संध्याकाळी आम्हाला गंगेवर फिरयला घेवून जायचे. संध्याकाळचे गंगेच्या प्रवाहाचे दृश्य फार मनमोहक असायचे . का फेडीत पाप ताप | पोखीत तीरीचे पादप | समुद्र जय आप | गंगेचे जैसे || ज्ञा .१६/३/१९९ .गंगा पाप ताप नष्ट करते व तीरावरचे झाडे व शेती पोषित तिचे उगमस्थान असणरा समुद्राला जावून मिळते.

        गाडगेबाबांचा पूल , दही पूल, दगडी पूल असे तीन पूल आहेत.  दोन तीन वेळेला गंगेला मह्पूर आला होता अशा या भयानक पुरात काही मुले पुलावरून उड्या मारून त्या महापुरात पोहायची.  गोदावरीच्या तीराला खूप पिंडी असायच्या ,  वातावरणात पावित्र्य अपोआप यायचे . मन कसे प्रसन्न व्हायचे . “ वाचे म्हणता गंगा गंगा | सकळ पापे जाती भंगा ||” ना.म.  हे अगदी खरे आहे . राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज त्यांच्या एका पदात म्हणतात

 गंगे ! तुझ्या तिराला, मन हे निवांत राही ॥धृ॥किति शांत धार वाहे ? पाणी अथाह राहे ।पापी जलात न्हाये, घे सौख्य तो सदाही ॥१॥

वाद्ये अनंत वाजे, किति चौघडे नगारे ।बहु भक्त येति भोळे, शोभा अगम्य पाही ॥२॥पितरास स्वर्गि न्याया, जणुं नाव तू तयांची ।

देवोनि अस्थिका ही, जन ठेवतात ग्वाही ॥३॥योगी-मुनी तिराशी, धरुनी बसे समाधी । तुकड्या म्हणे तुझ्या या, तिरि मोक्षची सदाही ॥४॥

किती सुंदर वर्णन वरील पदात आहे ! आम्ही मुले आनंदवल्ली येथे सुद्धा फिरयला जायचो तेथे गंगेचे रूप जरा अवखळ आहे.

       नासिक म्हटले कि श्रीराममंदिर (काळा राम मंदिर )विशेष म्हणजे येथे एक गोरा राम मंदिर सुद्धा आहे. वर्णभेद देवात सुद्धा भक्त मंडळींनी केले आहेत. नाही तर राम कुठ काळा आणि गोरा असतो का ?  हे अनेक कारणांनी प्रसिध्द आहेच हिंदूचे अस्मितेचे ठिकाण आहे  . तसेच काळा राम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंदोलन आणि आता तिथल्याच महंतांनी दलित मुलांना पूजा पाठ कसे करावे याचे दिलेले शिक्षण , पण पुन्हा त्यांना मंदिरात पूजेला प्रवेश मिळतो कि नाही हे सांगता येत नाही.  आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मागील काही वर्षात याच राममंदिरात मला श्रीमद्भागवत कथा करण्याची मिळालेली संधी (१२-०१-२०१३ ते १९-०१-२०१३)... हे भाग्य मला माझे गुरुबंधू ह भ प श्री भरतानंद सांगळे महाराज यांच्यामुळे लाभले खुप आनंद मिळाला. असे अनेक कंगोरे या मंदिराला आहेत.

     श्रीं राम जन्मोत्सवाची रथ यात्रा फारच भव्य असायची सर्व जातीधर्माचे लोक यामध्ये सामील व्हयाचे. गर्दीमुळे आई वडील जावू नको म्हणायचे गर्दीत हरवशील पण खर तर अशी गर्दी मला कधीच गर्दी वाटली नाही तो भक्तीचा मळा फुललेला असायचा. त्यात मला फार उत्साह वाटायचा . मिरवणूक मंदिरापासून निघून गणेशवाडीहून गाडगेबाबा पूल ,सराफ बाजार , मेन रोडला आली कि खूप मजा यायची भक्त मंडळी रेंगाळायाची मग पुढे हि मिरवणूक भांडी बाजार दहीपूल ,कपालेश्वर भेट परत स्वस्थानी .  सर्व वातावरण कसे राममय व्हायचे . तो आनंद आजही आठवला तरी बालपणात जातो आणि सर्व दृश्य  डोळ्यासमोर उभे राहते. आज परिस्थिती कशी विचित्र झाली आहे बघा जय श्री राम म्हणायचे तर विचार करावा लागतो लगेच धार्मिक भावना कधी दुखावतील सांगता येत नाही . जाती धर्म त्याहीवेळी होते पण भेद इतके तीव्र नव्हते.  

         पंचवटीमध्ये सीतेची गुंफा, तिचा संसार असे काही प्रदर्शिनीय वस्तू असायच्या.  मला प्रश्न पडायचा सीतेची गुंफा म्हणजे एक भुयार आहे , अजूनही आहे. व सीतेचा संसार म्हणजे काय तर स्वयंपाकाची सर्व साहित्य म्हणजे तवा, पोळपाट लाटणे , जाते वगैरे हे साहित्य खरेच त्याच वेळचे असेल काय? तर नाही ! हेच उत्तर असेल पण श्रद्धेला मोल नाही,  श्रद्धा नेहमीच अंध असते आणि ती अंध असते म्हणूनच आनंद मिळतो . तर्काच्या साह्याने तपासून पाहू लागलो तर  हाती निराशा येते . तर्काची अप्रीतीष्ठा ब्रह्मसूत्रामध्ये सांगितली आहे . पंचवटीमध्ये अजूनही पाच वडाची झाडे आहेत . याच पंचवटीतून रावणाने जगन्माता श्री सीतामतेच अपहरण केले होते . खरे रामायण येथून पुढेच झाले होते त्यामुळेच पंचवटीला एक आगळे वेगळे महत्व आहे.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा