आठवणी दाटतात भाग ५
आठवणी दाटतात
१ - शालेय जीवन
भाग -५ १९६७ साली वडिलांची बदली नगरला झाली आणि माझ्या आयुष्याचे
दुसरे पर्व सुरु झाले. तत्पूर्वी वडिलांनी आमचे मूळ गाव बुर्हानगर येथे अगोदरच घर
(माडी) बांधले होते त्यामुळे रहाण्याचा प्रश्न नव्हता . आमच्या गावापासून ४
किलोमीटर अंतरावर नगरला मराठा विद्या प्रसारक समाजाचे रेसिडेन्सीयल हायस्कूलमध्ये
सातवीला प्रवेश घेतला . मला वाचनाची आवड होती त्याला पोषक वातावरण या शाळेतील
वाचनालयात मिळाले वाचनालय प्रमुख श्री शेळके सर होते. माझा मित्र देवराम बारस्कर
जो आता चार्टड अकौटांट आहे . आम्हाला दोघानाही वाचनाची आवड होती आणि ज्याला एखादे
व्यसन असते तो त्यासाठी काहीही करू शकतो . आम्ही शेळके सरांना विनंती केली कि
आम्ही ,” आम्हाला वाचनाची आवड आहे तुम्ही जर आम्हाला वाचनालयात थांबू दिले तर फार
बरे होईल.” सर म्हणाले ,” वाचनालयात तुम्हाला काम करावे लागेल एका अटीवर ती म्हणजे
विनामोबदला वाचनालयात काम करावे लागेल .” काम तरी काय ! विद्यार्थ्यांना पुस्तके
देणे आणि रजिस्टरमध्ये नोंदी घेणे , सोपे काम होते. शेळके सरांनी
आम्हाला वाचनालयात थांबण्याची परवानगी दिली. याच वाचनालयात आम्ही तास न तास
बसायचो. वेगवेगळ्या कादंब-या , ललित
साहित्य धार्मिक व शालेय पुसतके सुद्धा
येथे वाचायला मिळाले.
१९७३ ला
अहमदनगर कॉलेजमध्ये पी. डी. ला प्रवेश घेतला
या कॉलेजची लायब्ररी आशिया खंडात मोठी
होती. माझी वाचनाची भूक वाढतच होती आणि तसे वातावरण मला मिळत होते. १९७४ ला एफ वाय
ला न्यू आर्ट्स and कॉमर्स कोलेजमध्ये ऍडमिशन
घेतले . तेथेही छान लायब्रररी होतीच त्याचा सुद्धा मी पुरेपूर लाभ घेतला. मन लावून
शिकविणारे प्राध्यापक होते. अगदी सुरवातीला आम्हाला प्राचार्य श्री ह. कि. तोडमल
सर होते. विद्यापीठात ते डीन होते. माझी ओळख झाली आणि सर म्हणाले , “तुझे वडील काय
करतात ?” मी म्हणालो ”वडील इरिगेशनमध्ये नाईक आहेत” . “ अरे !मग तुला खूप अभ्यास करावा लागेल तुला
काही अडचण आल्यास मला भेट .” हो म्हणालो आणि सटकलो तेथून कारण सरांचा दरारा फार
होता . ते जरी प्राचार्य होते तरी महाविद्यालयाच्या आवारात फिरून सर्व
विध्यार्थ्यांवर लक्ष ठेवीत असत. ते एकप्रकारे समर्पित प्राचार्य होते. सरांचे
अध्यात्म सुद्धा खूप तयार होते. . ते त्यांच्या घरी अमृतानुभव सांगायचे तेव्हा
नगरमधील विद्वान साहित्यिक श्रवणाला येत असत. आम्ही (१९९०) “ज्ञानियाची रसगंगा “
नावाचा ग्रंथ प्रकाशित केला होता त्यामध्ये सरांनी श्री संत मुक्ताबाई यांच्यावर एक उत्कृष्ट लेख लिहिला होता.
एक घडलेली मजेशीर
घटना सांगतो , थंडीचे दिवस होते , माझा मित्र आणि मी जरा उशिरा पोहचलो व वर्गात
मागच्या दरवाजाने जावून शेवटच्या बेंचवर जाऊन बसलो. थोडावेळ होतो न होतो तोच आम्ही मागील
दरवाजाने चहा पिण्यासाठी बाहेर पडलो आणि काय सांगावे नेमके प्राचार्य तोडमल सर
तेथेच उभे. खूब घाबरलो परत वर्गाकडे निघालो , सर म्हणाले ,” कुठे निघाला होतास ?”
ते इतके दरडावून बोलले कि काय सांगावे हेच सुचेना मी म्हणालो “ सर ! आमचे चुकले
आता परत नाही जाणार .” “ अरे पण कुठे
निघाला होतास हे सांग ना “. आम्ही चहा प्यायला निघालो होतो खुप थंडी आहे” सर
म्हणाले तुम्हाला थंडी आणि बाकीच्यांना नाही का थंडी वाजत ? अरे ! बाप तिकडे कष्ट
करतो आणि तुम्ही इथे मजा मारता ? जा वडिलांना घेऊन या .” असे म्हणून सरांनी आमचे
वह्या पुस्तके जप्त केले. आता काय करावे
वडिलांना सांगू शकत नाही कदाचित सांगितले तर ते सरांच्या समोरच मार देणार . मग
आम्हाला एक आयडीया सुचली आमच्या भावकीतील
एक अकौटट होते त्यांना सांगून ते वह्या
पुस्तके परत मिळविले . सरांच्या विषयी आणखी बरेच काही सांगायचे पण पुढे सांगतो .
विषयांतर नको .
त्यानंतर श्री खासेराव शितोळे सर प्राचार्य झाले त्यांना अध्यात्माची गोडी त्यांना होती त्यांचा विषय
अर्थ शास्त्र होता खूप सोपे करून सांगत असत. आता तर सरांनी तीन खंडात भगवत गीतेवर
सुंदर भाष्य लिहिले आहे. असा अनेक विद्वान व साहित्यिक विचारवंताचा सहवास सहज मला मिळत
गेला हे माझे भाग्य . .....क्रमश: भाग ६

सुंदर आठवणी.
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवाछानच माऊली
उत्तर द्याहटवाधन्यवाद माऊली सुप्रभात
हटवा