आठवणी दाटतात भाग -७

                                            आठवणी दाटतात 

                                                      भाग -७  


                  किसन महाराज त्या वेळी काही बाहेरची बाधा वगैरे आहे का ते सुद्धा बघत असत आसपासचे लोक आजारी वैगरे असले कि त्यांच्याकडे येत असत व काहींना बरे पण वाटत असे आज आपण अंधश्रद्धा म्हणू पण त्यावेळी असे काही बोलायची लोकांची तयारी नसायची . एकदा काय झाले गावातील एक माणूस नगरला कामाला जायचा तो संध्याकाळी घरी आला आणि बायकोचे नाव घेऊन म्हणायला लागला “ xxx अग ! मी मेलो आता , अग ! मी मेलो आता ” हे पालुपद सारखे सुरु होते. त्याची बायको बिचारी घाबरून गेली आणि तिने मग त्याला किसन महाराजानकडे  आणले . महाराजांनी त्याला बघीतले आणि सांगितले कि “बाधा फार मोठी आहे.” नगरला जातांना मध्ये रस्त्यात तीन चार स्मशान आहेत हिंदू, ख्रिश्चन व मुसलमान  त्यामुळे भुताची बधा होऊ शकते असा सर्वांचा समज . मग त्याच्यावरून कोंबडी ,नारळ उतारा करून वेशीच्या बाहेर टाकला खरे तर आमचा या गोष्टीवर विश्वास नव्हता .  अर्थातच  आम्ही दोन तीन मित्र गुपचूप गेलो आणि ती कोंबडी घेऊन पळून गेलो. त्या माणसाला काही फरक पडेना मग आम्हीच मध्यस्ती केली आणि त्याला सरकारी दवाखान्यात नेले तेथे डॉक्टरांनी तपासले व त्याच्या नाकातून एक नळी टाकून त्याच्या पोटातील द्रव्य बाहेर काढले आणि सांगितले कि याला काहीही  झाले नाही याने “अफू” खाल्ली आहे . खूप मजा आली भूत बाधा वगैरे काही खरे नाही. पण लोकांच्या गळी लवकर उतरत नाही.   

      



आमचे गावाचे नाव बु-हानगर आहे कारण बुर्हान निजाम शहा( १५०८-१५५३) याच्या नावावरून बु-हानगर नाव पडले . खरे तर आता बांगला देशाच्या  युद्धात श्री एकनाथ कर्डिले हे शहीद  झालेले असल्यामुळे त्यांचेच नाव गावाला देण्याचा ठराव केला गेला आहे ,  गावकर्यांनी स्वयंस्फूर्तीने “ एकनाथनगर “ हे नाव लावण्यास सुरवात केली आहे. असे हे ऐतिहासिक गाव आहे. आणखीही पुष्कळ सांगण्यासारखे आहे पुढे सांगणार आहे. 

                      गावात पिण्याच्या पाण्यासाठी एक मोठी जुनी म्हणजे चांदबीबीच्या काळातील एक बारव होती अजूनही हि बारव चांगल्या स्थितीत  आहे.  या बारावेतून एक भुयार निघते ते थेट चांदबीबीच्या  महालावर निघते असे जुने लोक सांगतात.  गावाजवळ एक ब्रिटीश कालीन तलाव आहे त्याचा पाझर या बारवेला येतो . त्याच तलवाच्या बाजूने बीडहून आलेली खापरी नळ लाईन (मोगलकालीन ) होती व त्यातून त्याही वेळा पाणी येत होते गुरुत्वाकर्षण नियमाने हि नळयोजना होती. आता हि नळलाईन बंद पडली आहे तिला मध्ये मध्ये  कारंजे सुद्धा  होते.ऐतिहासिक  जाण  नसल्यामुळे व शासनाची उदासीनता यामुळे ती खापरी नळ योजना संपली आहे. 

         विशेष म्हणजे या बारवेचे पाणी सर्व गावाला पुरत असे. या बारवेत मावलया आहेत  त्यांना शेंदूर  लावलेला आहे.  अतिशय शीतल आहेत  म्हणजे त्यांचा भक्तांना त्रास होत नसे. बारव कोरीव दगडांनी बांधलेली आहे. आता तिचा वापर होत नाही. आसपासच्या महिला आता त्याच बारवेवर गोवा-या थापून ऐतिहासिक वस्तूची एक प्रकारे विटंबना करतात. आता घरोघर नळाचे पाणी आहे त्यामुळे इकडे कोणाचे लक्ष जात नाही. बारवेच्या वरच्या बाजूला गावाची शेत जमीन आहे ती जमीन खंडाने गावक-याला कसण्यासाठी दिली असे. बारावेचे पाणी  शेतीसाठी सुद्धा वापरू शकत असत. 

        गावाच्या उत्तरेला वेस होती आता तिच्यात सुधारणा केली आहे पण ! त्या वेळी ती जुन्या पद्धतीची होती. तेथे एक छोटे दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर आहे. एक छोटे तळे  होते,  पावसात ते तळे पटकन भरत असे व त्यातील पाणी थेट गावातील शेवटच्या टोकापर्यंत जात असे व  काही घरात सुद्धा जात असे. मारुतीच्या मंदिरापुढे वाळू असायची आम्ही त्या वाळूत बालपणी खेळत असू , एकदा तर लहानपणी आम्ही त्याच वाळूने मारुतीला अंघोळ घातली होती . वेसिला लागुनच दगड्वर दगड रचून एक काळकायीचे मंदिर होते. आता ते सुस्थितीत आहे .  गाव अगदी छोटे होते पण त्यातही तीन आळ्या  होत्या , खालीची आळी , मधली आळी ,वरची आळी आणि वेशीकडे राजवाडा म्हणजेच हरिजन वस्ती ,  खरे म्हणजे हरिजन वस्तीला राजवाडा म्हणणे म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखेच वाटते. विशेष म्हणजे त्यांचा  देव, देवी हे सुद्धा वेगळे असायचे लक्ष्मीआई त्यांची देवी तिची जत्रा असायची त्या जत्रेत कधी रेडा , बोकड , कोंबड्या बळी दिल्या जात असत. आम्हाला हे आवडत नसे पण आमचे कोण ऐकतो ? पोतराजाच्या अंगात  आले कि मग मिरवणुकीने जत्रा सुरु व्हायची . त्यात रेडा व इतर प्राणी असायचे लक्ष्मीआईच्या मंदिराजवळ गेल्यावर हा बलिदानाचा  कार्यक्रम व्हायचा ते सर्व मांस हे हरिजन लोक घेउन जात असत. 

            अस्पृश्यतेचे स्तोम त्या काळी आमच्याही गावात होतेच ,राजवाड्यातील लोकांना  बारवेत उतरून पाणी घेय्ण्याची परवानगी नसायची. ते लोक बारवेच्या वरच्या बाजूला बसायचे आणि अगदी गयावया करून पाणी मागायचे . सवर्ण लोक , स्त्रिया बारवेतून पाणी घेऊन वर येवून त्यांना पाणी देत असत अर्थात एखाद्यालाच  दया येत असे . मी सुद्धा  पाण्याला हंडा घेऊन जात असे . अस्पृश महिला आणि मुले व काही पुरुष सुद्धा बारवेच्या वरच्या बाजूला बसायचे. गयावया करून पाणी मागायचे.  माझा  त्यांच्यात एक मित्र होता आम्ही कधीही भेद पाळीत नव्हतो आमचे घर सुधारित संस्काराचे होते. आमचे वडील आणि आई दोघेही या पद्धतीला मानीत नव्हते. तो मित्र .... ,” ए ! अशोक मला एक हंडा दे ना रे “ मला फार वाईट वाटायचे ५०-६० पाया-या चढून पाणी आणावे लागत असे , कंटाळा यायचा पण मित्राची दया यायची . मी त्याला बारवेतून पाणी आणून देत असे. ते बघून बाकीचेही म्हणायचे ,” अशोक आम्हाला पण देना रे पाणी !”  वाईट अवस्था होती कसे बसे अजून एखाद्याला पाणी देवून मी घरी जायचो . बाई मला विचारायची ,” खूप  उशीर झाला रे !” बाई अग ! मांगवाड्यातील काही लोकांना पाणी देत होतो.” “अरे दमून नाही का गेला “   “दमून गेलो खरे आहे ,  पण !काय करू मला बघवत  नाही.” बाईला माझे कौतुक वाटायचे आणि काळजी पण. नंतर गावातील लोक सुशिक्षित झाले आणि या जुनाट प्रथा सुद्धा संपल्या .

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणी दाटतात भाग १

आठवणी दाटतात भाग २

आठवणी दाटतात भाग ३