आठवणी दाटतात- भाग -८
आठवणी दाटतात
भाग -८ उत्तर प्रदेशाचे रामलीला पथक
आमचे गावात त्या वेळी म्हणजे साधारण १९७३-१९७४ दरम्यान
रामलीला पथक यायचे हे लोक उत्तर प्रदेशचे असायचे ते लोक हिंदी आणि व्रज भाषेत बोलत
असत. मराठी त्यांना समजत नसे पण त्यावाचून काही अडत नसे . त्यांचा मुक्काम
मारुतीच्या मादिरातच असायचा . दिवसभर गावात फिरायचे व लोकसंपर्क जोडायचे , त्यांचे
बोलणे मोठे प्रेमळ असायचे . “ केल्याने देशाटन सभेत संचार पांडित्य येत असे फार “
हे खरे आहे. ते मारुतीच्या मंदिरात पुराणातील कथा , रामायण, कृष्ण लीला असे करीत असत . ते लोक अगदी कसलेले नट असत.
महिना महिना ते गावात राहत असत त्यांना ज्वारी,गहू दिले तरी
चालत असे. कार्यक्रम रात्री साधारण ८-९ वाजता सुरु होत असे . कारण बहुतेक
प्रेक्षक वर्ग हा शेतकरी आणि महिलांना शेतीत काम करून घरी स्वयपाक व सर्वांचे
आवरून देवून मग या रामलीलेच्या कार्यक्रमाला
यावे लागत असे. कार्यक्रमात महिला
वर्ग जास्त असत व त्या भावूक होत जात असत व ८ आणे १ रुपया दक्षिणा देत असत. दिवसभर केलेल्या कष्टाचे
चीज होत असे व मानसिक स्थिती सुद्धा चांगली होत असे. दृश विषय आणि प्रत्यक्ष अभिनय
त्यमुळे गावतील बहुतेक लोक येत असत. विषय धार्मिक आणि जिव्हाळ्याचा असल्यामुळे
ओढ लागत असे.
एकदा काय
झाले त्यांचे स्त्री पात्र करणारा नट गावाला गेला आत त्यांची अडचण आली . कोणी तरी
त्यांना सुचवले कि अशोक चांगला बोलतो व दिसयला गोरापान आहे त्यला हे स्त्री पार्ट
करायला सांगा .. झाले आमच्यापर्यंत ते लोण आले . मी म्हणालो, “मी स्त्री पार्ट
करीन पण मिशा काढणार नाही , मिशा काढल्या तर आप्पा मला खूप मारतील त्यांना मिशा
काढणे बिलकुल आवडत नाही. “ ती मंडळी मला म्हणाली "तसे काही नाही मिशा फक्त वर वर काढायच्या ." , मी कबूल झालो. स्त्री पार्ट होते हरिचंद्र राजाची राणी “तारा राणी”
मेकप केला त्यांनी मिशा संपूर्ण काढल्या मी खूप नाराज झालो पण विलाज नव्हता .
त्यात प्रसंग असा होता हरिश्चंद्र राजा डोंबा घरी काम करतो आणि स्मशानात आलेल्या
प्रेताचा दहानाकरीता कर गोळा करतो . नेमके तारा राणी तिचे मुल मृत होते आणि त्याचे
दहन करण्याकरीता तारामती तेथे येते राजा काही कर
दिल्याशिवाय प्रेताचे दहन करू देत नाही. राणीचा मुलगा कोण असावा हा प्रश्न निघाला
तेव्हा अवधून देशपांडे हा जरा वयाने लहान
होता त्याला “रोहित” बनवले त्याचे काम काय तर त्याने फक्त तारामतीच्या
मांडीवर डोके टेकवून पडून राहणे . प्रसंग खूप भावनाशील व्हावा म्हणून मी “ बाळ कसे
नेवू जलातुनी बाळ कसे नेवू || “ हि खरी तर गौळण होती पण मी येथे मुद्दाम घेतली
विशेष म्हणजे ती भैरवी रागात होती
त्यामुळे हृदयाला भिडत होती. आणि जवळच एका
घमेल्यात गोव-या पेटवून ठेवल्या त्यामुळे स्मशानाचा फील आला . माझी भैरवी रंगली
आणि मांडीवरील अवधूत म्हणजेच रोहित गडबड करायला
लागला , मी रंगून गेलो होतो आणि याची गडबड , मला काही कळेना. मी त्याला
डोळ्यांनीच गप्प बसण्याकरिता खुणावत होतो . माझा रंगाचा बेरंग होत होता, शेवटी
त्याला बोलाल्यावाचून पर्याय उरला नाही . तो मला म्हणतो कसा ! ,´अरे ! मला खूप लघवी लागलीय
, काय करु ?” मी त्याला डोळ्यानेच खुणावले पण तो ऐकतो कसचा , त्याची ती हालचाल
प्रेक्षकांच्या लक्षात आली आणि प्रसंग एवढा गभीर होता कि महिला अक्षरश: रडत होत्या
आणि माझ्या साडीच्या ओटीत पैसे टाकीत होत्या. शेवटी अवधूत न राहवून माझ्या
माडीवरून उठून मंदिराच्या मागे पळत गेला. ह्या प्रसंगाने मात्र सर्व गांभीर्य निघून गेले
आणि लोक हसून हसून बेजार झाले .
दुसर्या दिवसी
सकाळी झोपेतून उठलो आणि अप्पांनी मला बघितले आणि डोळे लाल केले म्हणले ,” xxxxx मी मेलो की काय ? मिशा भादरून माझ्या पुढे
आलास ? “ आणि एक रट्टा जोरात माझ्या पाठीत
पडला . पण यापेक्षा रात्रीचा प्रसंग आठवला कि हसू यायचे .
पूर्वी
आधुनिक सोयी सुविधा नव्हत्या पण कलेची कदर खेड्यातील लोकांना असायची.अगदी जत्रेतील
तमाशा म्हणजे फार मोठी करमणूक आमच्या गावातही तमाश्चे छोटे फड येत असत. विविध
प्रकारचे कलाकार , भारुड करणारे , कीर्तनकार पोतराज असे लोक येत असत. बलु लोक, लमाण तांडा असे फिरस्ते सुद्धा येत असत यांना मात्र पोलीस
पाटलाकडे हजेरी द्यावी लागे
(पोतराजाचे छायाचित्र प्रातिनिधिक आहे ) असाच एक पोतराज कुठून तरी आमचे गावात आला मोठा चांगला कलाकार होता . डफावर पौराणिक आख्याने लावायचा रात्री साधारण ८.३० ते ९. ०० वाजता सुरु होता असत आणि पाहटे ४.०० वाजेपर्यंत ते आख्यान रंगत असे मग त्यात चिलया बाळाची कथा , कधी ध्रुव बाळाची कथा, कौरव पांडवाची कथा असे विविध विषय असत हे एक प्रकारचे प्रबोधन , संस्कार असायचे . करमणूक तर होतच होती पण लोकजागृती सुद्धा होत होती. तो इतके भावपूर्ण बोलत असे , चिलया बाळाची कथा ऐकतांना महिला अक्षरश: डोळ्याला पदर लावून रडत असत. अशी हि माणसे अशिक्षित पण संस्कारी होती व प्रचारक सुद्धा.
कुंडलिक महाराज
कर्जतकर म्हणून एक कीर्तनकार गावात यायचे
गाडगेबाबांच्या पद्धतीने कीर्तन कारायचे तब्बेत जबरदस्त होती चालू कीर्तनात एका
दारुड्याने त्यांना आव्हान दिले ,महाराजांनी लगेच दंड थोपाडून शड्ड ठोकला तो माणूस
घाबरला आणि निघून गेला . यांची कीर्तन कण्याची शैली मोठी मनोरंजक असायची
संवादात्मक उपदेश असायचा दृष्टांत नेहमी उभय समंत असावा म्हणजे वक्त्याला आणि
श्रोत्याला आनंद मिळतो . नाही तर “ कानडीने केला मराठी भरतार | एकाचे उत्तर एका न
ये ||” असे व्हायला नको. महाराजांचे कीर्तन चांगले रंगात आले आणि त्यांनी एक दृष्टांत
सांगितला . एका मुलाचे नवीन लग्न झाले
होते , खेड्यातील हे जोडपे , पूर्वीचा काळ घरात इतरांच्या देखत बोलता येत नसे .
योगायोगाने ती मुलगी एक दिवस गोठ्यात गाईंचे शेण गोळा करीत होती . त्या मुलाला वाटले त्याची आईच आहे
कारण पहाटे थोडा अंधार असतो . तो मुलगा तिला म्हणाला ,” तुझे हे काम झाल्यावर
शेतातला गहू काढ .” तिला एवढा आनंद झाला कि कधीही न बोलणारा नवरा चक्क गहू काढ
म्हणला ... आनंदातीरेकाने हर्षवायू झाला आणि म्हणू लागली ,” कधी नाही बोलले अन गहू
काढ म्हणले .” महाराजांनी हे वाक्य ताला
सुरात म्हटले, झाले हे वाक्य सर्व गावात
पोर विनादाने . म्हणायला लागले . असे विविध प्रकार मनोरंजन आणि प्रेरणा
देण्याचे काम करीत होते हीच तर खरी भारतीय आणि खेड्यातील आपली संस्कृती आहे.
तेव्हा कुठला मिडिया होता गावात एक दोन रेडीओ होते बाकी नाही. पण हा चालता बोलता
मेडीया प्रभावी होता. हि खरी लोकसंस्कृती


खूपच छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद !
हटवा