आठवणी दाटतात भाग ६

                                                          आठवणी दाटतात 

                                            भाग -६  -  भजनाचा  छंद लागला

                                                  


               


     शालेय , महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतांनाच मला भजनाचा  छंद लागला . आमचे गावात एक मारुतीचे जुन्या पद्धतीचे मंदिर होते. तेथे एकादशी , सोमवार , गुरुवार व पर्वकाळी भजन असायचे पण आम्ही तेव्हा माळकरी नव्हतो. भजनी मंडळी आमचा राग करीत असत, आम्हाला लवकर धृपद म्हण्याची सुद्धा संधी देत नसत . पण जीद्द होती म्हणून आम्ही त्यावेळचे नगरमधील प्रसिध्द युवा गंधर्व श्री दुधाडे रावसाहेब यांच्याकडे संगीताचा क्लास लावला . आणि थोडे  फार ताल स्वर कळू लागले.

         श्रावण महिन्यात आमचेकडे नवनाथ पोथी असायची वक्ता दुसरा पण माळकरी असायचा. मला वाचायची परवानगी नसायची कारण आम्ही मांसाहार पण करीत होतो. अर्थात श्रावण महिन्यात बंद .

                  एक दिवस काय झाले , खालच्या आळीतील मारुतीच्या मंदिरात रामविजय सुरु होता वाचणारे वारकरी होते आम्ही अभ्यासला त्याच मंदिरात जायचो त्यामुळे सहज यांची पोथी ऐकण्यात येतच होती . वाचणारे थोडे मुडी होते एक दिवस नाही आले. त्यांच्या काही विचित्र अटी असायच्या . श्रोतृवरातील महिला मला म्हणाल्या ,” का रे! अशोक तू पोथी वाचतो का ? “ मी म्हणालो माझ्या गळ्यात माळ नाही तुम्हाला चालेल का ? “ त्या हो म्हणाल्या.  मग काय विचारता बसलो पाटावर आणि खड्या आवाजात पोथी वाचली. शाळेत वक्तृत्व स्पर्धेत नेहमी भाग घेत होतो त्यामुळे सभाधीटपणा अगोदरच होता. रामविजय ग्रंथ होता . आम्हाला त्यावेळी  शाळेत कवितेमध्ये  काही संतवांग्मय असायचे त्यातच ह्या रामविजय ग्रंथातील काही ओव्या असायच्या त्यामुळे मला काहीही अवघड गेले नाही. सर्व महिला म्हणाल्या “इथून पुढे अशोकच पोथी वाचील “. त्यावेळी पोथी वाचणार्याला सांगतेच्या वेळी कपडे करून मग त्याला दक्षिणा  देवून, महाप्रसाद होत होता. मी त्यांना म्हणालो ,” माझ्या गळ्यात माळ नाही त्यामुळे मला तुम्ही कपडे वगैरे काहीही करू नका आणि दक्षिणा सुद्धा नको ". मला एकच महत्वाचे होते ते म्हणजे मला पोथी वाचायला संधी मिळते. त्यानंतर वारकरी महारजांनी आकांडतांडव केले , ते म्हणजे त्यांचे म्हणणे असे होते कि पोथी हि माळक-यानेच वाचावी आणि याच्या तर गळ्यात माळ नाही .पण सर्व श्रोतृवर्ग माझ्या बाजूने होता ते म्हणाले ,” त्याच्या गळ्यात माळ नसे ना कि , तो तुमच्यापेक्षा चांगली पोथी सांगतो शिवाय त्याच्या काहीच अटी नाहीत तो आम्हाला परवडतो .” त्यामुळे मला यांचा विरोध फार सोसावा लागला. मला या ग्रंथ वाचनाचा एक फायदा झाला तो म्हणजे परमार्थाची चांगली आवड उत्पन्न झाली . गावात ठीकठिकाणी पोथी वाचनाचे आमंत्रण येऊ लागले

                   ह. भ. प. किसन महाराज जाधव नावाचे  बाणेश्वराचे पुजारी होते त्यांची आणि माझी चांगली मैत्री होती. मी अभ्यासाकरिता बाणेश्वर मंदिरात जायचो , तेथे किसान महाराज आणि मी दोन -चार तास अध्यात्मिक चर्चा करीत बसायचो. व संध्याकाळी बाणेश्वराची आरती करूनच घरी यायचे . घराची एवढी ओढ लागत नसे कारण आप्पा खूप दारू प्यायचे आणि बडबड करायचे . गावाला त्यांची गम्मत वाटायची . विशेष म्हणजे दारूचा अड्डा गावातच होता. आम्हाला त्यांच्या व्यसनाचा फार त्रास भोगावा लागला .  किसन महाराजाला अध्यात्मिक ग्रंथ ऐकायची फार आवड होती, त्यांना वाचता येत नव्हते आणि थोडी नजर देखल कमी होती . त्यामुळे ते मला म्हणायचे ,” अशोक तू हरीविजय  आमचे घरी वाचतो का ? “. मी म्हण्याचो “महाराज ! मी तर मांसाहार करतो पोथी वाचली तर चालेल का ? तुम्हाला काही अडचण वाटणार नाही का ? “  ते म्हणाले “ तू अस कर! पोथी वाचून होईपर्यंत खाऊ नको  रात्री पोथी झाल्यावर खुशाल खा काही हरकत नाही .”  एवढी परवानगी मिळाल्यावर  मग काय विचारता ! सोनेपे सुहागा ! आमचा हा क्रम ब-याच वर्षे सुरु होता. एक दिवस किसन महाराज मला म्हणाले ,” अशोक तू कीर्तनकार होशील .” मी म्हणालो महाराज मी कोणत्याच पद्धतीने योग्य नाही .” अरे ! मी म्हणतो ते खरे होते कि नाही ते तूच बघशील .”  मला त्यावेळी ते खरे वाटले नाही , पण त्यांची वाणी खरी झाली, कशी झाली का झाली हे मी सांगू शकत नाही पण झाली एवढे खरे .

क्रमश: ७ 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आठवणी दाटतात भाग १

आठवणी दाटतात भाग २

आठवणी दाटतात भाग ३